www.zunjarneta.com
12--1201




आमच्या विषयी



स्व.वरपे दादांचे आयुष्य पाहिले की एखाद्या अथांग समुद्राप्रमाणे भासते. दादांचे कार्यकर्तृत्व लिहिणे हे एका लेखात अथवा एका पुस्तका बसणे शक्यच नाही. दादांचे कार्यकर्तृत्व हे अवघ्या मराठवाड्याने पाहिले आहे. मराठवाड्याच्या पत्रकारीतेतील एक दैदिप्यमान इतिहास म्हणजे दादा. त्यांच्या जीवनात अनेक चढ उतार त्यांनी पाहिले. हजारो लोकांशी त्यांचे संबंध होते. राजकिय, सामाजिक क्षेत्रातील लोकांची त्यांच्याकडे नेहमी ये- जा असायची. आलेल्या प्रत्येकाचे ते सौदार्हपुर्वक स्वागत ते करायचे, कधी वैचारीक पातळीवर मतभेद निर्माण व्हायचे... प्रकाशित झालेल्या बातम्यांकडे प्रकरण न्यायालयापर्यंत जायते पण आपली तत्वे, विचार, भूमिकेशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. ‘मी जे छापलं ते छापलं आता माघार नाही’ ही त्यांची भूमिका प्रामुख्याने राजकिय क्षेत्राशी निगडीत असणार्या लोकांनी अनुभवली. दादांचा मुळपिंड जो होता तो पत्रकारीतेचा. त्यामुळे परखड विचारशैली त्यांच्यात रुजली होती. संपादक म्हणून त्यांनी आपली कर्तव्ये पार पाडली. स्व.विलासराव देशमुख, डॉ.पद्मसिंह पाटील, बीडचे लोकप्रिय खासदार गोपीनाथराव मुंडे, शिवाजीराव पंडित, सुंदरराव सोळंके, सोनाजीराव क्षीरसागर यांच्याशी तसेच रिपाइंचे रामदास आठवले यांच्याशी दादांचे जवळचे संबंध होते.
                         संपादक म्हणून त्यांनी आपली कर्तव्ये पार पाडली. बातमीमुळे कुठलाही अतिरेक होणार ना ही. कोणाच्या भावना दुखावणार नाहीत याची ते खबरदारी घेत. भडकावू लेखन त्यांनी कधीही झुंजार नेता मधून केले नाही. त्यांना ते आवडले नाही. समाजात घडणार्या वास्तव परिस्थितीला ते झुंजार नेतात स्थान द्यायचे.
                         समाजप्रबोधन, समाजाला योग्य दिशा देण्यासाठी दि.3 मार्च 1965 रोजी स्व. वरपे दादा यांनी ‘झुंजारनेता’ हे साप्ताहिक सुरू केले. काही महिन्याच्या काळानंतर त्यांनी साप्ताहिकाचे रूपांतर दैनिकात केले. 1966 ते 1972 पर्यंत ट्रेडल प्रिटींग केली. 1972 साली सिलेंडर आणि 1994 मध्ये वेब ऑफसेट पध्दतीने छपाई करणारा झुंजारनेता आता बहुरंगी, बहुढंगी, 16 पानांचे लोकप्रिय दैनिक झालेले आहे. झुंजारनेताची लोकप्रियतेपाठीमागे दादा यांचे मोठे कष्ट आहे. आज जरी झुंजारनेताचा मराठवाडाभर नावलौकिक असला तरी सुरूवातीचा काळ हा अतिशय हालाखीचा, त्रासदायक दादांनी सहन केलेला आहे. वार्ताहर मेळाव्यास आपले अनुभव व्यक्त करताना दादा नेहमी पुर्वीचे दिवस, त्यांचे मित्र परिवार, सुख दु:ख, कटु अनुभव सांगत नवोदितांना मार्गदर्शन करीत. पत्रकार मंडळीना ‘दादा’ नेहमी सांगत की, पत्रकारांनी पथ्य पाळणं आवश्यक आहे. नितीमुल्य सांभाळत, वृत्तपत्र व्यवसायासाठी प्रामाणिक राहणार्या पत्रकारांनी प्रामाणिक राहिले पाहिजे. समाजहिताला प्राधान्य देणारी, माणुसकीला जागुन पत्रकारिता केली पाहिजे. न्यूज ऍन्ड व्ह्युज’ यांचा समतोल पाळण्याची गरज आहे. नेहमी झुंजारनेता परिवारातील आपल्या शिलेदार असणार्या वार्ताहरांचे कौतुक करण्याचे काम आणि त्यांना प्रेरणा देऊन त्यांची कामाची गती वाढविण्याची मोठी कला ‘दादा’ यांच्याजवळ होती.
                         नव्वदच्या दशकात वृत्तपत्र क्षेत्रात मोठी क्रांती झाली. संगणकाच्या व्यापकतेमुळे जुनी असलेली छपाईची कामे अधिक वेगाने नामशेष होवू लागली. ट्रेडल छपाई सारखी यंत्राची जागा ऑफसेट सारख्या आधुनिक यंत्राने घेतली. झुंजार नेताने आधुनिकतेचा नवा अंगारखा घालून ऑफसेटव्दारे छापईची सुरुवात केली. वाचकांना अभिप्रेत असणारे साहित्य झुंजार नेतामधून देण्याचा प्रयत्न दादांनी केला. दादांचा दृष्टीकोन हा सर्वव्यापी होता.काळाची पाऊले ओळखून पत्रकारीतेत त्यांनी केलेले बदल हे आजच्या युवा पत्रकारांना आदर्शवतच ठरणारे आहेत. आपल्या मतावर ठाम असणारे दादा एकदा बातमी छापली की कोणत्याही परिस्थितीत माघार घेत नव्हते. दादांनी सत्याची पाठराखण, सत्याला पाठींबा आणि अन्याय, अत्याचार, सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले.
                         4 डिसेंबर 2008 रोजी दादांचे झालेले आकस्मीत निधन हे सर्व झुंजार नेता व वरपे कुटुंबियांसाठी मोठी हानी होती. दादांच्या अचानक निघून जाण्याने लेखणीचे बळ ही कमजोर झाले होते. दादा देहाने जरी आमच्यात नसले तरी चैतन्य रुपाने ते आपल्यात आहेत हिच भावना घेवून झुंजार नेताचा प्रत्येक जण उत्साहाने पुन्हा कामाला लागला आहे. दादांचे विचार, आदर्श, समोर ठेवून झुंजार नेता वाटचाल करीत आहे.










 Site best viewed in 1024 X 768 resolution
Proudly Powered by Ashvamedh Software-9975208920
Copyright 2013 zunjar Neta e-Paper